दक्षिण सोलापूर : तालुक्यातील होटगी ते गाव तालुका अध्यक्षांचे गाव म्हणून परिचित आहे. सध्या काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील व भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी याच गावचे असून यापूर्वी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या प्रमुख चारही पक्षाचे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष हे होटगी गावचेच होते.
यंदा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्ह्यात 9 मतदारसंघ वाढणार आहेत. त्यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यात होटगी हा नवा मतदारसंघ गठीत होणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी अनेक दिग्गज इच्छुक आहेत. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील व भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी हे दोन्ही नेते उमेदवार राहतील अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.
या दिग्गज नेत्यांना टक्कर देण्यासाठी होटगी मधील एक युवा कार्यकर्त्याने जोरदार तयारी सुरू केली आहे त्या कार्यकर्त्याचे नाव आहे सचिन पंडित व्हनमाने. व्हनमाने यांनी 2014 ते 2020 दरम्यान भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष सांभाळले आहे. अनेक सामाजिक उपक्रम राबवून आपली स्वतंत्र छबी तालुक्यामध्ये निर्माण केली आहे. होटगी आसपासच्या अनेक गावात युवक कार्यकर्त्यांची फळी त्याने निर्माण केलीय.
जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यामागील उद्देश व्हनमाने यांना विचारले असता, गावात अनेक नेतृत्व निर्माण झाले, मात्र 30 वर्षांपासून होटगी गावचा विकास खुंटला आहे. होटगी भागात असलेले सध्याच नेतृत्व बिनकामाचे असल्याचा आरोप त्यांनी नाव न घेता केला. म्हणूनच कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या मनात खदखद आहे.
संभाव्य मतदारसंघाच्या दृष्टीने आपली जोरदार तयारी सुरू आहे. गावोगावी जाऊन आपण ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेत आहोत, त्यांचे प्रश्न समजून घेतोय. जनतेने संधी दिल्यास निश्चित ती सार्थ ठरवू. प्रथमच होटगी जिल्हा परिषद मतदारसंघ होत असल्याने याठिकाणी दिग्गज नेत्यांमध्ये चुरस राहणार असून युवकांचे मत निर्णायक राहणार आहे.

















