सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस बिज्जू अण्णा प्रधाने यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. बिज्जू प्रधाने यांनी 2017 मध्ये महापालिका निवडणूक लढवली होती. त्यात केवळ 84 मतांनी त्यांचा पराभव झाला.
प्रभाग 4 हा भाग बाळे परिसराचा असल्याने त्या भागात बिज्जू प्रधाने यांनी मते मिळवली मात्र त्या प्रभागात बहुजन समाज पार्टीचे चारही नगरसेवकांनी विजय मिळवला होता. गणेश पुजारी यांच्याकडून प्रधाने यांचा पराभव झाला. त्याच भागात जनाधार असल्याने पुन्हा प्रधाने याच भागातून इच्छुक आहेत. मात्र आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्या भागातून उमेदवारी देण्यास नकार दिला. प्रधाने हे स्थानिक नसल्याने उमेदवारी देणार नाही म्हणून सांगण्यात आले. तेव्हापासून बिज्जू प्रधाने हे आमदार विजयकुमार देशमुख विरोधात असल्याचे चित्र दिसून आले.
नगरसेवक सुरेश पाटील यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून त्यांनी चित्र स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते दिसले. काँग्रेसच्या माजी महापौर अलका राठोड यांनी प्रधाने यांची भेट घेतली होती मात्र प्रधाने हे कमळ सोडून आता हातात घड्याळ बांधणार असल्याचे खात्रीशीर माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात बिज्जू प्रधाने हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सोलापुरात सुरू झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर 18 फेब्रुवारी रोजी प्रधाने यांनी शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे आपल्या भारतीय जनता पार्टी सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे. प्रधाने यांनी माजी महापौर दिलीप कोल्हे यांच्या सोबत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
बिज्जू प्रधाने यांनी आजपर्यंत भाजपमध्ये भाजयुमो सरचिटणीस, भाजप शहर सरचिटणीस, भाजप शहर संघटन सरचिटणीस अशी पदे भूषविले आहेत.

















