सोलापूर : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा प्रचार सध्या शिकलेला आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून सत्ताधारी पॅनलच्या विरोधात दूध संघ बचाव कृती समितीचे उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या सून वैशाली साठे या विरोधी गटात उमेदवार असल्याने प्रचारात रंगत वाढली आहे.
याच पार्श्वभूमीवर अक्कलकोट दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील मतदारांची बैठक दिलीप माने यांच्या ब्रह्मदेवदादा माने बँकेच्या सभागृहात बुधवारी घेण्यात आली. या बैठकीला ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे, माजी सभापती अशोक देवकते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महिला प्रतिनिधी मतदारसंघातील दक्षिण तालुक्यातील सारिका पाटील यांनी सत्ताधारी पॅनलला आपला पाठिंबा जाहीर केला. पॅनल प्रमुख आमदार बबनदादा शिंदे म्हणाले, दूध संघ सध्या अडचणीत आहे ही निवडणूक बिनविरोध कशी होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केला विरोधकांना सुद्धा आम्ही बोलावून चर्चा केली मात्र अपेक्षित तोडगा निघाला नाही त्यामुळे अखेर निवडणूक लागली आहे. अतिशय चांगले उमेदवार निवडणुकीला उभे असून कपबशी या चिन्हाला सर्वांनी मतदान करावे. असे आवाहन करत बळीराम काका साठे यांच्या सून या निवडणुकीत उमेदवार आहेत, काका यांनी स्वतः फोन केला मात्र गडबडीमध्ये त्यांना सांगता आले नाही अर्ज माघार घेण्याचाही प्रयत्न त्यांनी केला पण तो स्वीकारला नाही जरी त्यांची सून उमेदवार असली तरी कपबशी याचं चिन्हाला मतदान करायचे आहे असे सांगायला बबनदादा विसरले नाहीत.
सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले, दूध संघाच्या निवडणूक लागण्या पाठीमागे अनेक कारणे आहेत. खुल्या जागांपेक्षा इतर प्रवर्गामध्ये सर्वाधिक उमेदवार आले. त्यामध्ये ओबीसीच्या जागेसाठी मोठा वेळ लागला. शेवटी अक्कलकोट आणि दक्षिण तालुक्याने समन्वयाची भूमिका ठेवून माघार घेतली. दूध संघाला अडचणीतून उभारी द्यायचे आहे, त्यासाठी सरकारची सुद्धा मदत लागणार आहे ही नेते मंडळी सरकार आहेत आणि हेच सरकार सहकाराला मदत करतील म्हणून मताचे विभाजन होऊ देऊ नका, कपबशीला मतदान करा असे आवाहन केले.
दिलीप माने म्हणाले, मी दूध संघात मागील वर्षी अध्यक्ष म्हणून काम केले आहे. अनेक अडचणींना तोंड दिले. दुधाचे संकलन कमी झाले, प्रत्येक तालुक्यात खाजगी दूध संघ सुरू झाल्याने या अडचणी दूध संघासमोर आहेत. मात्र सर्व जिल्ह्यातील नेत्यांनी एकत्र येऊन या दूध संघाला उभारी देण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवार निवड करताना अतिशय जिकिरीचे होते, उत्तर, अक्कलकोट आणि दक्षिण तालुका नेत्यांनी प्रत्येक तालुक्याला संचालक देण्याची मागणी केली मात्र निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमचा प्रयत्न होता, आम्ही समन्वयाची भूमिका घेतली.


















