उत्तर सोलापूर : तालुक्यातील नान्नज गावा लगत 500 फुटावर असलेल्या एका विहिरीत महिलेचा मृतदेह आढळला. त्या महिलेने विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली की तिचा विहिरीत पडून मृत्यू झाला याचा मात्र तपास सुरू आहे. मयत महिला ही नान्नज ग्रामपंचायतची माजी सदस्य असल्याचे समोर आले आहे.
सविता संतोष मोरे वय 35 असे मयत महिलेचे नाव आहे. तिच्या पश्चात दोन मुले पती असा परिवार आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश चोरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता मोरे या ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य होत्या. रविवारी सविता या घरात नसल्याने दुपारी दीड ते दोनच्या सुमारास नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली असता गावापासून सुमारे पाचशे फुटावर असलेल्या एका विहिरीच्या बाजूला त्यांची चप्पल आढळली मात्र विहिरीत काही दिसले नाही. शोध सायंकाळी साडेपाच पर्यंत सुरू होता, परंतू त्यांचा शोध लागला नाही. शेवटी ज्या विहिरीच्या बाजूला चप्पल आढळली त्या विहिरी मध्ये कॅमेरा सोडून पाहिले असता आत मध्ये महिलेचा मृतदेह आढळला त्यानंतर आकडा टाकून तो मृतदेह बाहेर काढला असता सविता मोरे यांचा तो मृतदेह होता त्यानंतर तो मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हील हॉस्पिटल कडे पाठविण्यात आला आहे.

















