सोलापूर : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी खासदार अनिल देसाई उपस्थित होते . यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोलापूरच्या राजकीय परिस्थिती जाणून घेतली.
आगामी सोलापूर महापालिका निवडणुक, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पक्षाची परिस्थिती याची माहिती घेतली. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी लक्ष्मीकांत तुमची कोणतीही पक्षातून हकालपट्टी झालेली नाही असे सांगत ठोंगे पाटील यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या.
सोलापूर शहरात लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांचे जिल्हाप्रमुख पद काढल्यानंतर पक्षाने पुरुषोत्तम बरडे यांच्याकडे जिल्हाप्रमुख पद दिले. तेव्हापासून ठोंगे पाटील हे सक्रिय दिसले नाहीत. दरम्यान त्यांची हकालपट्टी केल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली. मात्र ठोंगे पाटील हे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांच्या संपर्कात कायम होते. कामगार सेनेच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू असल्याचे पाहायला मिळाले.
पक्षांतर्गत धुसफूस- वाद मिटवण्यासाठी शिवसेनेचे वरिष्ठ कोणीही प्रयत्न करत नसल्याचे चित्र आहे. उघड उघड पक्षात दोन गट असल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी ही धोक्याची घंटा असल्याचं बोललं जातं.

















