सोलापूर : शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्राध्यापक शिवाजी सावंत हे बुधवारी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आले होते. ते त्यांच्या पीए सोबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्या चेंबरकडे वळाले मात्र धोत्रे हे मुंबई दौऱ्यावर असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली.
याचवेळी काही पत्रकारांनी त्यांना पाहिले आणि पत्रकारांनी जिल्हा परिषदेमध्ये येण्याचे कारण विचारले. माढा तालुक्यातील वाकाव इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्याला 37 लाख रुपये मंजूर आहेत मात्र तो निधी काम सुरु नसल्याने परत जाईल अशी माहिती सावंत यांना मिळाली होती त्यामुळे ते तावातावाने जिल्हा परिषदेमध्ये असल्याचे समजले.
यावेळी अतिरिक्त सीईओ धोत्रे यांचे पीए घोडके यांच्याशी त्यांनी संपर्क साधून या कामाबाबत विचारणा केली, घोडके यांनी चौकशी केली आणि सांगितले की, संबंधित निधी हा परत जाणार नाही तर तो खर्च करता येईल. त्यामुळे त्यांनी सुटकेचा निश्वास टाकत लवकरात लवकर काम सुरू करण्याच्या सूचना संबंधित कॉन्ट्रॅक्टरला देतो असे त्यांनी सांगितले.
यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी विविध विषयांवर गप्पा मारल्या. यामध्ये जिल्ह्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार, जिल्हा परिषदेचे कामकाज, त्याचबरोबर आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या विविध विषयावर चर्चा झाली. जिल्हा परिषदेवर सुमारे एक वर्ष प्रशासक राहील असा अंदाज सावंत यांनी व्यक्त केला. तशी कारणे ही सांगितली.
सोलापूर जिल्ह्यात मागील दोन वर्षांमध्ये भरपूर पाऊस झाल्याने यंदा अतिरिक्त ऊस मोठ्या प्रमाणात शिल्लक राहील असा अंदाज व्यक्त करत याला कारण ऊसतोड टोळ्या असल्याचे सांगितले. शिमगा सणाच्या निमित्ताने सर्व टोळ्या सोलापूर सोडून जातात त्यामुळे अडचण येते. भविष्यात कारखान्यांना हार्वेस्टर मशीन घ्यावी लागेल असेही ते म्हणाले.


















