सोलापूर : बुधवार दुपारची वेळ….,जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार हे आपल्या कार्यालयात कामकाज करत होते…,काही पत्रकार त्यांच्याकडे येऊन विकास निधी संदर्भात चर्चा करत होते, याच वेळी प्रशांत कोळी नामक एका त्यांच्या मित्राचा फोन अजय पवारांना आला, साहेब कर्जाळ जवळ दुचाकीवर जाताना माझ्या बहिणीचा अपघात झाला आहे.
तिच्या डोक्याला मार लागलाय असे कोळी यांनी सांगितले. नेमके कर्जाळ कुठे आहे असे पवार यांनी पत्रकारांना विचारले, तेव्हा सोलापूर-अक्कलकोट रोडवरील कर्जाळ आहे असे सांगताच त्यांनी तातडीने महामार्गावरील अँबुलन्स सेवेला फोन लावला. त्यांना माहिती दिली. भागव्वा कोळी साधारण वय 30 च्या आसपास असे अपघात झालेल्या महिलेची माहिती देण्यात आली.
प्रशांत कोळी यांना अँबुलन्सच्या संपर्कात राहायला सांगितले. एवढ्यावर न थांबता पवार यांनी त्वरित इतर डॉक्टरांशी संपर्क करत न्यूरोसर्जन कुणी आहेत आणि त्या जखमी रुग्णाला उपचारासाठी कुठे न्यावे लागेल याची माहिती घेतली तेव्हा कुंभारी इथल्या अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचार होतील तिथे संबंधित न्यूरॉसर्जन असल्याची माहिती मिळाली.
तेव्हा तातडीने त्या जखमी महिलेस दुपारी दोनच्या सुमारास अश्विनी मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्याने महिलेचा जीव वाचला.अजयसिंह पवार यांची तत्परता आणि माणुसकीमुळेच हे घडले.


















