बार्शी : बापावर असलेला राग काढण्यासाठी त्याच्या 12 वर्षीय मुलाचा गळा दाबून खून करणार्या विश्वास जनार्धन साळुंखे वय 50 राहणार भाटनिमगाव तालुका इंदापूर यास सोलापूर सत्र न्यायालयाने आरोप सिध्द झाल्याने जन्मठेपेची आणि दंडाची शिक्षा सुनावली.
याप्रकरणी सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल प्रदीपसिंह रजपूत, सहाय्यक सरकारी वकिल प्रदीप बोचरे यांनी तर मूळ फिर्यादीच्यावतीने ऍड. दिनेश देशमुख यांनी काम पाहिले.
आरोपी विश्वास साळुंखे याने जत्रेसाठी गावी आल्यानंतर इंद्रकुमार (वय 12) आणि आर्यन गायकवाड यांना उजनी धरणाजवळ भीमानगर येथे मासे पकडण्यासाठी जायचे आहे. म्हणून फूस लावून आपल्या दुचाकीवर बसवून नेले. रस्त्यात मध्येच त्याने आर्यन यास खाली उतरविले आणि इंद्रकुमार यास सोबत नेले. पुढे माढा तालुक्यातील शिराळ गावच्या हद्दीत ऊसाच्या शेतात नेवून त्याने इंद्रकुमारचा गळा दाबून खून केला आणि करमाळा पोलिस ठाण्यात हजर झाला.
याप्रकरणी त्याच्यावर टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होवून स.पो.नि. घनश्याम बल्लाळ यांनी दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाच्या सुनावणीत 12 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये मयताचा भाऊ आर्यनची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने त्या दोघांना मासे आणण्यासाठी दुचाकीवर नेले होते. त्याचप्रमाणे लास्ट सीन थेअरी नुसार रसवंतीगृहाचा मालक परशुराम व बाळासाहेब नवले या बंधूंनीही आरोपीस मयतासोबत जाताना पाहिल्याचे सांगितले. त्यांच्याच रसवंती समोर आरोपीने आर्यनला उतरवून इंद्रकुमारला सोबत नेले होते.
आरोपी पोलिस ठाण्यामध्ये स्वत:हून हजर झाल्यानंतर त्याने दिलेल्या गुन्ह्याची कबुली करमाळ्याचे तत्कालीन पो.नि. घोलप यांनी स्टेशन डायरीमध्ये नोंदविली होती. त्यामुळे तसेच आरोपीची वैद्यकीय तपासणी केलेल्या आणि त्यामध्ये आरोपीच्या अंगावर ओरबडल्याच्या खुणा दिसून आलेल्या डॉ. अंजली शेळके यांची, डॉ. मनिष पांडे यांची साक्ष, तपासाधिकार्यांनी घटनास्थळावरुन आरोपीचे ओळखपत्र, वाहन चालक परवाना असलेले पाकिट व चप्पल जप्ती बाबत केलेला पंचनामा सहाय्यभूत ठरला.
सरकारी पक्षाच्यावतीने सादर करण्यात आलेले वरिष्ठ न्यायालयाचे विविध निवाडे तसेच प्रभावी युक्तीवादानंतर सत्र न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी आरोपीचा गुन्हा शाबित झाल्याचे घोषित करुन त्यास भा.दं.वि. 302 नुसार जन्मठेपेची व 2 हजार रुपये दंडाची, दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी कैद, कलम 363 नुसार 7 वर्ष सश्रम कारावासाची व 1 हजार रुपये दंडाची, दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद, कलम 364 अन्वये 10 वर्षाची शिक्षा व 1 हजार रुपये दंडाची, दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद ठोठावली. न्यायालयात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस नाईक अमृत खेडकर यांनी काम पाहिले.

















