सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्ष निवडीवरून सोलापूर शहरांमध्ये चांगलेच राजकीय वातावरण तापल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरांमध्ये बदल होणार नाहीत तोपर्यंत महेश कोठे यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार नाही अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता महेश कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेश होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
एकूणच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रविवारी भारतीय जनता पार्टीचे दिवंगत कार्यकर्ते वीरभद्रेश बसवंती यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला सर्व पक्षीय हजेरी होती. भाजपचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी, कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाला मात्र शहरातील दोन्ही देशमुख आमदारांनी दांडी मारली.
राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले महेश कोठे हे कार्यक्रम संपण्याच्या दहा मिनिटे अगोदर आले त्यावेळी सुशीलकुमार शिंदे यांचे भाषण चालू होते, भाषण संपण्याच्या अगोदर शिंदे यांनी आमचा महेश आता आला नाहीतर तो सुद्धा बसवंती यांच्याबाबत भाषणात बोलला असता असे सांगून कोठे हे अजून आपलेच असल्याचे जणू ते सांगून गेले.
शिंदे यांचे भाषण संपल्यानंतर महेश कोठे उठून शिंदे यांच्याकडे आले, तेवढ्यात शिंदे यांच्यासमोर भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी आले त्या दोघांनी हस्तांदोलन केले आणि पुढे निघाले, कोठे यांनी लगेच खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यासह रेणुक शिवाचार्य स्वामी यांचे चरण स्पर्श करत आशीर्वाद घेतले त्यानंतर शेजारी असलेल्या काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्याशी हस्तांदोलन केले.नंतर सर्व नेते बसवंती यांच्या पुतळ्याकडे सामूहिक फोटो काढण्यास गेले.





















