अक्कलकोट : सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या एकसष्टीनिमित्त ८ एप्रिल रोजी अक्कलकोट येथील टिनवाला फंक्शन हॉलमध्ये त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती गौरव समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी दिली.
तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाधान शिबिराच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरिबांना एकाच ठिकाणी शासकीय स्तरावरील कागदपत्रांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. त्याच दिवशी दिवसभर काँग्रेसची डिजिटल महासभासद नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
त्यानंतर सायंकाळी ६ वाजता नागरी सत्कार सोहळा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माजी ग्रामविकास मंत्री बसवराज पाटील, माजी दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार प्रणिती शिंदे, अफझलपूरचे आमदार एम. वाय. पाटील, आमदार संजयमामा शिंदे, इंडीचे आमदार यशवंतगौडा पाटील, माजी आमदार बी. आर. पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, आदींची उपस्थित राहणार आहे. या पत्रकार परिषदेत सुरेश हसापुरे, अशपाक बलोरगी, मल्लिकार्जुन काटगाव, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, अरुण जाधव, सभापती आनंदराव सोनकांबळे, मंगल पाटील, आदी उपस्थित होते.
सिद्धाराम म्हेत्रे मित्र परिवाराच्या वतीने नागरी सत्कार कार्यक्रमाचे योग्य असे नियोजन करण्यात येत आहे एकसष्टीचा नागरी सत्कार नसून माजी मंत्री म्हेत्रे यांचे एक प्रकारे शक्तिप्रदर्शन राहणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.



















