सोलापूर : सोलापूरचे माजी मंत्री, अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे (sidharam mhetre) यांच्या एकसष्टीचा नागरी सत्कार कार्यक्रम शुक्रवारी विराट अशा जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमाला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, (Chagan Bhujbal) राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार संजय मामा शिंदे, (Sanjaymama Shinde) कर्नाटकातील आजी-माजी आमदार, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कन्या शीतल म्हेत्रे (Shital Mhetre) यांचे राजकीय लॉंचिंग जोरदार पद्धतीने झाले. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते शीतल यांचा विशेष सत्कार करण्यात आला, राजकीय स्टेजवर बोलताना आपल्या पहिल्याच भाषणात शीतल म्हेत्रे यांनी उपस्थितांची मने जिंकली,
ज्या पद्धतीने अक्कलकोटकरांनी आजपर्यंत सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आशीर्वाद दिले तसेच आशीर्वाद त्यांच्यापुढील पिढी सोबत ही असू द्या अशी अपेक्षा त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.

















