सोलापूर : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन शाखा सोलापूर जिल्हयाच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्या शिक्षकांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलनानंतर निवेदन देण्यासाठी माध्यमिक शिक्षण अधिकार्याकडे शिष्टमंडळ गेले असता त्या ठिकाणी शिक्षण अधिकारी भास्करराव बाबर नव्हते. तेव्हा संतापलेल्या शिक्षकांनी त्यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी दाखवली
मात्र कार्यालयात कायमच माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कराव बाबर हे उपस्थित नसतात, फोन स्विच ऑफ असतो, विचारले तर मुंबई उच्च न्यायालयात तारखेसाठी गेले आहेत, असे सांगणे येते. हे किती दिवस चालणार? बाबर तोंड लपून का फिरतात? मुंबई उच्च न्यायालयाच्या तारखेला जातो असे सांगून ते भारती विद्यापीठ या ठिकाणी एका कार्यालयात ठिय्या मांडून असतात त्या ठिकाणावरून आपली बरीच कामे ते उरकून घेतात, यामागे काय गौडबंगाल आहे? असा प्रश्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
या गांधीगिरी आंदोलनाची माहिती जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना समजली तेव्हा त्यांनी भास्कराव बाबर यांना फोन लावण्यास सांगितले. यावेळीही बाबर यांचा फोन बंद होता, यामुळे सीईओ दिलीप स्वामी हे चांगलेच चिडले आहेत, बाबर यांना ते नक्कीच कानपिचक्या काढतील अशी चर्चा ऐकण्यास मिळते.
दरम्यान आंदोलनकर्त्या संघटनेच्या मागण्या काय आहेत ते पाहूयात
१. मयत DCPS कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान तात्काळ अदा करण्यात यावे.
२. बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी शासन निर्णयानुसार विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विज्ञान विषय शिक्षक, मुख्याध्यापक पदोन्नती करणे व समाजशास्त्र नकार मंजूर करावेत.
३. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या बांधवांबरोबरच जिल्ह्यातील सर्व आस्थापनेच्या Dcps धारकांचा कपातीचा हिशोब हिशोब चिठ्ठीसह देणे. जमा रक्कम व्याजासह एनपीएस खात्यावर वर्ग करण्यात यावी.
४. कन्नड़ व उर्दू माध्यमाच्या सर्व संवर्गातील पदोन्नती प्रक्रिया तातडीने पार पाडावी.
५. शिक्षकाचे प्रलंबित वैद्यकीय वीले मंजूर करणे.
६. शिक्षकांचे नियमित वेतन वेळेवर देणे. ७व्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम व इतर थकीत भत्ते तातडीने अदा करावेत.
७. दोन वर्षांपासून पात्र शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी मंजूर करणे.



















