सोलापूर : पंढरपूरची वारी करून माघारी जात असताना वारकऱ्यांच्या छोटा हत्ती वाहनाला ट्रकने दिलेल्या धडकेत वीस वारकरी जखमी झाले आहेत. जखमींवर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून गंभीर जखमींना सोलापूरच्या सिविल हॉस्पिटल कडे शासनाच्या 108 क्रमांकाच्या ॲम्बुलन्स मधून रवाना करण्यात आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील नारायणपूर या गावातील सुमारे 25 वारकरी छोटा हत्ती टमटम या एम एच 41 ए यु 3080 यातून पंढरपूरला वारी साठी आले होते. दर्शन घेऊन ते आपल्या गावी बुधवारी परतत असताना सकाळी साडे अकराच्या सुमारास पंढरपूर टेंभुर्णी रस्त्यावरील अजोती पाटी गावडे वस्तीजवळ वेगवान टँकरने धडक दिली यामध्ये टमटम पलटी झाला. या अपघातात 20 वारकरी जखमी झाले आहेत. व्होळे ग्रामस्थांनी तातडीने जखमींची मदत केली, त्यांना उपचारासाठी हलवले अशी माहिती उपसरपंच गावडे यांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच बिव्हीजी 108 क्रमांक ॲम्बुलन्स सेवेचे जिल्हा व्यवस्थापक डॉक्टर अनिल काळे यांनी तातडीने पंढरपूर येथील वाळवंट आणि 65 एकरतील असलेल्या 108 क्रमांकाच्या दोन ॲम्बुलन्स पाठवल्या. जखमींना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून 13 गंभीर जखमी असलेल्या वारकऱ्यांना सिविल हॉस्पिटल कडे रवाना करण्यात आले आहे. त्यामध्ये 2 वारकरी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली.



















