सोलापूर : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने डॉल्बी साऊंड सिस्टमला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे भीमसैनिकात संतापाचे वातावरण पसरले आहे. दोन बेस आणि दोन टॉपला परवानगी द्यावी यासाठी आंदोलनं सुरू आहे. अद्यापि त्यावर तोडगा निघालेला नाही.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर
बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, येथून सिद्धेश्वर मंदिर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे येणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात कार्यकर्त्यांची गर्दी जमा होत असून त्या ठिकाणीही पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेसमोर उपोषण गेटला पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. सकाळी दहा पासूनच जिल्हा परिषदेच्या गेटवर बंदोबस्त तैनात दिसून येतोय. नुकतच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा इंदापूर शहरात डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डॉल्बीच्या तालावर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्या पार्श्वभूमीवर निघत असलेल्या या मोर्चात हा विषय भाषणात उपस्थित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


















