उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 15 सप्टेंबर रोजी दोन वर्षाच्या बालकाला पेंटा व्हॅलेंटची लस देण्यात आली होती या लसीकरणानंतर त्या बाळाचा काही दिवसानंतर मृत्यू झाला आरोग्य सेविकेच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची तक्रार करण्यात आली या प्रकरणी नातेवाइकांनी आंदोलन केल्यावर चौकशीचे आदेश देण्यात आले,
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांची नातेवाईकांनी भेट घेतल्यानंतर संबंधित आरोग्यसेविकेवर कारवाई करण्याची मागणी झाली यावर प्रशासनाने चौकशी समिती नेमून अभिप्राय दिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आरोग्य सेविकेस निलंबित केले तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.
या बाळाच्या आईला न्याय मिळावा म्हणून गावातील महिला सारिका वाघमारे, चित्रकला बनसोडे, पूनम मसलखांब यांनी तब्बल दोन वर्ष प्रशासनाच्या पायऱ्या झिजवल्या. पालकमत्री दत्ततात्र भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव यांच्या वारंवार भेटी घेतल्या. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजयसिंह पवार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतलकुमार जाधव माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे तिऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आनंद गोडसे, जनसंपर्क अधिकारी रफिक शेख, सामान्य प्रशासन विभागाचे अनिल जगताप, मयत बालकाचे आई वडील प्रशांत मसलखांब, उर्मिला मसलखांब तसेच सारिका वाघमारे,चित्रकला बनसोडे, पूनम मसलखांब यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून एक लाखाचा धनादेश देण्यात आला.
सुमारे दोन वर्षाच्या अथक परिश्रमातून त्या मयत झालेल्या बालकाच्या आईला न्याय मिळाल्याबद्दल सारिका वाघमारे यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. त्या म्हणाल्या, आम्ही दोन वर्ष प्रयत्न करत होतो, गावाने आम्हाला नावं ठेवलं, पण आमच्या उपस्थितीत चेक या आईला मिळतोय याचा आनंद आहे.



















