सोलापूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समारोपाच्या मिरवणुकीत रविवारी विजेच्या धक्क्याने 26 वर्षीय सूर्यकांत निंबर्गी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी दिनांक 17 रोजी रात्री अकराच्या दरम्यान महापौर बंगल्या जवळ हा प्रकार घडला.
दरम्यान 8 दिवसानंतर मयताचा भाऊ सुनील चंद्रकांत निंबर्गी यांनी सदर बजार पोलीस ठाण्यात कलम 304 अ नुसार बॉबी ग्रुप जयंती उत्सव अध्यक्ष व इतर पदाधिकारी तसेच महावितरणचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, माझा भाऊ मयत सूर्यकांत हा दि. १७/०४/२०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणुकी पाहणेस महापौर बंगला, रेल्वे लाईन, सोलापूर येथे आला असता तेथील बॉबी ग्रुप आंबेडकर जयंती मंडळाचे जनरेटरमधील डिजीटल फोटोस सोडलेला करंटने अथवा एम एस ई बी सर्व्हिस वायरमधील करंट हा बॉबी ग्रुप मंडळाचे डिजीटल फोटोस लागला असुन त्यात फिर्यादीचा भाऊ सुर्यकांत यास करंट लागुन त्याचा मृत्यु झाला आहे.
म्हणून वरील बॉबी ग्रुप मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच एम एस ई बी विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे निष्काळजीपणाने व हलगर्जीपणामुळे झाला असावा म्हणून फिर्यादीची कायदेशिर फिर्याद आहे. याप्रकरणी तपास फौजदार क्षिरसागर हे करीत आहेत.


















