सोलापूर : सराईत गुन्हेगार राम ऊर्फ पप्पु अरुण कोरे, वय ३३ वर्षे रा. हौसे वस्ती, अमराई, सोलापूर यास एमपीडीए अधिनियम, १९८१ अन्वये दि. २७/०४/२०२२ रोजी स्थानबध्द केले आहे.
राम ऊर्फ पप्पु अरुण कोरे हा मागील अनेक वर्षीपासून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी दहशत व भिती घालून नागरीकांविरुध्द गुन्हेगारी वर्तन केले आहे. तो स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी व्यापारी व सामान्य नागरीक यांना दहशत व भिती घालून मरिआई चौक, हौसे वस्ती, अमराई, थोबडे वस्ती, देगाव रोड, यशोधरा हॉस्पीटल येथील आर्पाटमेंट जवळ, गवळी वस्ती, सरस्वती चौक, रामलाल चौक, फौजदार चावडी पोलीस ठाणे परिसर, गंगा नगर, लक्ष्मी चाळ, हब्बु वस्ती, लोकसेवा हायस्कूल जवळ, रिलायान्स मार्केट, भैय्या चौक, सुपर मार्केट या परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आहे.
या परिसरात घातक शस्त्रानिशी फिरुन जिवघेण्या घातक शस्त्रानिशी फिरुन हल्ला करणे, खंडणी मागणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, अपहरण करणे, बेकायदेशिर जमाव जमवून गैरकृत्य करणे, गृह अतिक्रमण करणे, विनयभंग करणे, घातक हत्यारे बाळगणे, अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणे यासारखे गंभीर गुन्हे करत असतो. अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करुन राम ऊर्फ पप्पु अरुण कोरे याने परिसरात दहशत व भिती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली आहे. अशा प्रकारे त्याने परिसरात दहशत निर्माण करून स्वतःस धोकादायक इसम म्हणून सिध्द केले आहे.
राम ऊर्फ पप्पु अरुण कोरे याचे विरुध्द शहरातील फौजदार चावडी व जेलरोड पोलीस ठाण्यास ०९ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याच्या नोंदी आहेत. त्यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०१७ मध्ये क.५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार तडीपार केले होते, सन २०२० मध्ये क. ११० (ई) (ग) फौ.प्र.सं अधिनियमानुसार सन २०२० मध्ये क. १४४ (३) फौ.प्र.सं अधिनियमानुसार दोन वेळेस व सन २०२१ मध्ये क. १४४ (१) फौ.प्र.सं अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती.
राम ऊर्फ पप्पु अरुण कोरे याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही, पुन्हा त्याने सन २०२२ मध्ये अलीकडील काळात त्याच्या साथीदारांसह गैरकायदेची मंडळी जमवून घातक शस्त्राद्वारे गंभीर दुखापत पोचुन गंभीर स्वरुपाचा स्वरुपाचा गुन्हा केला आहे.
राम ऊर्फ पप्पु अरुण कोरे याचे विरुध्द वेळोवेळी कार्यवाही करुनही त्याच्या गुन्हेगारी वर्तनामध्ये कोणतीच सुधारणा झाली नाही. त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी मा. पोलीस आयुक्त यांनी त्यास एमपीडीए अधिनियम, १९८१ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यास आदेशाची बजावणी करुन येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यासाठी रवानगी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त हरीश बैजल सोलापूर शहर यांनी कार्यभार स्विकारल्यापासून एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची पाचवी व या वर्षातील तिसरी कार्यवाही आहे.



















