सोलापूर : मोहोळ तालुक्यातील पापरी जिल्हा परिषद शाळेला मैदानासाठी शाळेच्या शेजारील अडीच एकर गायरान जागेचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तातडीने मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगताच केवळ तीन दिवसात त्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे 30 एप्रिल रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा उपक्रम असलेल्या स्वछ शाळा सुंदर शाळा अंतर्गत मोहोळ तालुक्यातील पापरी गावच्या शाळेची पाहणी केली होती.
यावेळी आपल्या भाषणात शाळेला चांगले मैदान आहे असा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा हे छोटे मैदान आहे आम्हाला शाळेच्या मागील बाजूचे मोकळे मैदान हवे आहे अशी मागणी ग्रामस्थांमधून पुढे आली. शाळेच्या मागील बाजूस पाच एकर गायरान जमीन आहे ती जमीन द्यावी असे ग्रामस्थ म्हणताच पाच एकर का?असा सवाल अजित पवारांनी केला तेव्हा त्यापैकी अडीच एकर जमिनीच्या प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याच्या सूचना अजित पवार यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना केली होती.
त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या सूचनेची तातडीने अंमलबजावणी करत एक हेक्टर जमिनीचा प्रस्ताव शाळेला देण्यासाठी शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली. या एक हेक्टर जागेवर मैदानासह शाळेच्या खोल्या बांधण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.


















