सोलापूर : दिनांक २७/०६/२०२० रोजी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सोलापूर जिल्ह्यात दौरा चालू असताना दलित पॅन्थर या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र सचिव आतिश बनसोडे यांनी त्यांचे कार्यकर्त्यासमवेत सदरचा ताफा अडवुन त्यांना महाराष्ट्रात सध्या चालू असलेल्या मागासवर्गीयांवरील अत्याचाराचे सत्र त्वरीत थांबविण्याबाबत निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता, पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन सरकारी कामात अडथळा केला तसेच जिल्हाधिकारी यांचे कोविड- १९ करीता दिलेल्या हुकूमाचा भंग केला.
या कारणास्तव भा.द.वि. कलम ३५३,१८८ व ३३८,३४ सह गुन्हा दाखल केला होता. सदर खटल्याचे कामी सरकारी पक्षाकडून तीन साक्षीदार तपासून याकामी पुरावा सादर केला असता, आरोपी आतिश बनसोडे यांचे वकिल अॅड. अजय रणशृंगारे यांनी साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच कोणत्याही बळाचा वापर नसल्यास भा.द.वि. कलम ३५३ लागू होत नसलेबाबत जोरदार युक्तीवाद केला. सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीची मे. कोर्टाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
सदर खटल्याचेकामी आरोपीच्या वतीने अॅड. अजय रणशृंगारे, अॅड. अनिता रणशृंगारे, अॅड. रविराज सरवदे, ॲड. विशाल मस्के, अॅड. कपिल चलवादी, ॲड. निकीता थोरात, ॲड. सुरज पाटोळे, अॅड. सत्यजीत वाघमारे यांनी कामकाज पाहिले.

















