दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत, नियोजित रे नगर आणि गोदूताई वसाहतीसह नगरपरिषदेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. मात्र कुंभारी ग्रामपंचायत वगळून रे नगरला स्वतंत्र नगर परिषदेचा दर्जा देण्याची मागणी कुंभारी गावकऱ्यांनी केली होती. कुंभारी ग्रामपंचायत वगळून रे नगरला नगर परिषद दर्जा देता येणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली.
अखेर सोमवारी याबाबतची नगरविकास विभागाकडून अधिसूचना जाहीर झाली आहे विरोध डावलून कुंभारीला नगरपरिषदेचा दर्जा दिला आहे. दरम्यान त्यावर जिल्हा प्रशासनाने हरकती मागवल्या असता कुंभारी नगरपरिषदेवर 10 हरकती प्राप्त झाल्या असून याव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर सुनावणी होऊन जिल्हा प्रशासनाने आपला अभिप्राय देत तो मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवून दिल्याची माहिती नगर विकास विभागाचे सह आयुक्त एन के पाटील यांनी दिली
या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळाल्यास कुंभारी-रे नगर अशी संयुक्त नगरपरिषद अस्तित्वात येणार आहे.
नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर निधी उपलब्ध होण्यातही अडचणी येणार नाहीत. त्यामुळे नागरिकांना सोयीसुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर कुंभारीचेही महत्त्व वाढून येथील नागरिकांनाही रे नगरप्रमाणेच सोयीसुविधांचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान नगर विकास विभागाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात कुंभारी ग्रामपंचायतच्या वतीने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेमध्ये कुंभारी ग्रामपंचायत वगळून नगरपरिषद स्थापन करावी अशी मागणी ग्रामस्थानी याचिकेमध्ये केली आहे दरम्यान याबाबत अद्याप कोणतीही सुनावणी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

















