सोलापूर : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र सुहास कदम (suhas kadam) यांना पक्षाने तडकाफडकी पदावरून काढले आहे तसा आदेश विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे (sunil gavhane) यांनी काढला असून खुलासा येईपर्यंत पद स्थगित ठेवण्यात येईल असे सांगण्यात आले.
अभिनेत्री केतकी चितळे (ketki chitale) हिने शरद पवार (sharad pawar) यांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त पोस्टनंतर संपूर्ण महाराष्ट्रात तिच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व आक्रमक झाले आहेत त्याच अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सुहास कदम यांनी आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना एक पत्रक काढले होते त्या पत्रात….,
पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रसेचे सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, कॉलेज अध्यक्ष यांना सुहास कदम यांनी एक पत्र लिहलं. या पत्रात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या की येथून पुढे जो कोणी शरद पवार यांच्या विरोधात खालच्या शब्दात टीका करेल त्याला शोधा आणि तोडा. यासंदर्भात पत्रात त्यांनी लिहलं की, “आदरणीय पवार साहेब हा विचार आहे आणि त्याच विचाराला गालबोट लावण्याचा प्रयत्न समाज कंटाकाकडून होत आहे त्यामुळे हे सुधारण्याइतपत लायकीचे नाहीत, त्यामुळे यांना सरळ करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून, जो कुणी “पवार कुटुंबाबाबतीत खालच्या भाषेत वक्तव्य करत असेल तर त्याला शोधायचे आणि तिथेच तोडायचे” ही मोहीम आपणास आज पासून सुरु करायची आहे. तरी सर्व पदाधिकारी यांनी याबाबत आपल्या विभागात तात्काळ बैठक घेऊन सर्व पदाधिकारी यांना सूचना करावी” अशी भूमिका कदम यांनी मांडली होती. या पत्राची दखल घेत तातडीने सुहास कदम यांना पदावरून काढण्यात आले आहे.
गव्हाणे यांनी त्या पत्रात…
आपल्याला या पत्राद्वारे कळविण्यात येते की, पक्ष संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आपले काम होत नसून बरोबर त्याच्या उलट कृती आपल्याकडून होत आहे असे निदर्शनास आले आहे. या कारणास्तव आपले पद स्थगित करण्यात येत आहे. आपल्याकडून पुढील खुलासा येईपर्यंत आपले पद स्थगित ठेवण्यात येईल.


















