सोलापूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बुधवार 25 मे रोजी वाढती महागाई व बेरोजगारी बाबत केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक धरणे आंदोलन करण्यात आले. विडी कामगार महिला, बांधकाम कामगार, यंत्रमाग कामगार यांचा मोठा सहभाग होता. यावेळी जिल्हा परिषदेच्या गेटसमोर असलेल्या झाडाला कार्यकर्त्यांनी दोन भोंगे लावले होते, सध्या भोंग्यांचा विषय ऐरणीवर असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना भोंगे काढण्यास सांगितले.
त्यावेळी अनिल वासम, युसूफ मेजर यांनी सदर बजार पोलिसांना जाब विचारला. बराच वेळ चर्चा झाली, पोलिसांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली, भोंगे काढा साउंड आणा, परंतु ऐनवेळी साउंड कुठून आणणार असा विषय झाला असता पोलिसांनी आवाजाची मर्यादा ठेवण्यास सांगितली. आडम मास्तर मात्र भोंगे असू द्या, गुन्हा तर गुन्हा या भूमिकेवर ठाम होते.
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महागाई आणि बेरोजगारी वरील विविध पोस्टर बॅनर घेऊन लक्ष वेधले दरम्यान केंद्र सरकारच्या महागाई, बेरोजगारी धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली…
आडम मास्तर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना प्रत्येक देशातील कष्टकरी महिलेस केंद्र सरकारने साडे सात हजार रुपये द्यावे, गॅस सिलेंडरच्या दरामध्ये केंद्र सरकारने कपात केली मात्र तो उज्वला या योजनेचा लाभार्थ्यांसाठी फायदा होणार आहे. नऊ कोटी लोकांकडे उज्वला गॅस आहे मात्र इतर लोकांचं काय 2014 पूर्वी डिझेल व पेट्रोल दर गॅसचे दर जे होते त्याप्रमाणेच किंमती असाव्यात अशी भूमिका मांडली…
या आंदोलनात माजी नगरसेविका कामिनी आडम, नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख, एडवोकेट एम एच शेख, शिवानंद झळके, वेंकटेश कोंगारी, दत्ता चव्हाण, अफसाना बेग, प्रशांत बल्ला, विक्रम कलबुर्गी,अकील शेख यांच्यासह कार्यकर्ते कामगार मोठ्या संख्येने सहभागी होते.



















