सोलापूर : सात रस्ता परिसरात गरुड बंगला येथे एका इमारतीमध्ये असलेल्या एल अँड टी फायनान्स कंपनीच्या फेक कर्जाचा सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ३६ युवकांच्या गळ्याला फास बसला आहे. ३७ व्या फसवणूक झालेल्या युवकाने सिबिल खराब झाल्याचे समजतात ,तातडीने बुधवारी सोलापूर कार्यालय गाठले. कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली .मात्र सोलापूर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे आणि सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांना याची माहिती समजताच त्यांनी थेट कार्यालयात जाऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची खरडपट्टी केली. जोपर्यंत या युवकांना कंपनीकडून एनओसी मिळत नाही, तोपर्यंत कार्यालय चालू देणार नाही, असा इशारा देत कंपनीच्या कार्यालयालाच बुधवारी दुपारी संतप्त होत टाळे ठोकले .
दरम्यान नियोजन भवन येथे दुपारी चार वाजता फसवणूक झालेल्या युवकाला व एल अँड टी कंपनीच्या स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अमोल शिंदे आणि माऊली पवार यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. जिल्हाधिकारी शंभरकरसुद्धा संतापले आणि ज्याचा दोष नाही आणि ज्याचा या कर्जाची काहीही संबंध नाही अशा सर्व युवकांना कंपनीकडून तातडीने एनओसी देण्याचे आदेश दिले. तसे न झाल्यास फसवणूक झालेले युवक आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल करतील असा दम भरला.
दिवसभरातील या सर्व घडामोडींमुळे एल अँड टी कंपनीचे सोलापूरचे अधिकारी आणि कर्मचारी धास्तावले आहेत. त्यांनी पुणे स्थित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून कंपनीकडून न्याय देण्याचा शब्द देण्यात आला आहे. तरीसुद्धा जोपर्यंत फेक कर्जात अडकलेल्या युवकांना एनओसी मिळत नाही ,तोपर्यंत कार्यालय उघडू देणार नाही, असा इशारा अमोल शिंदे आणि माऊली पवार यांनी दिला आहे .
सात रस्ता परिसरातील जगजीवन कॉम्प्लेक्स गरुड बंगला येथे एल अँड टी फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयातील एक कर्मचारी, एक एजंट आणि एका बँकेच्या कर्मचाऱ्याने संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली आणि एक नव्हे ,दोन नव्हे तर तब्बल आतापर्यंत ३७ युवक आणि नागरिकांच्या नावावर वाहनासह अन्य कर्जे काढून ती उचलली आहेत .विशेष म्हणजे याचे बिंग फुटू नये म्हणून आरोपींनी स्वतः काही महिने हफ्तेसुद्धा भरले आहेत. मात्र नंतर याची एकेक प्रकरणे बाहेर येऊ लागल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वर्षभरापूर्वी जुना विडी घरकुल येथील किरण कोंडा आणि जुनी मिल कंपाऊंड येथील मोहम्मद ख्वाजा पाशा मोहम्मद कासिम मुल्ला या दोघांविरुद्ध सदर बझार पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. कंपनीचे सोलापूर कार्यालयांमधील एरिया सेल्स मॅनेजर तुकाराम यनगंटी यांनी हा गुन्हा दाखल केला आहे .
दरम्यान पंढरपूर तालुक्यातील खरसोळी येथील शिवाजी बाबर या युवकाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून १० लाखाचे कर्ज मंजूर झाले आहे. परंतु आपले सिबिल रेकॉर्ड खराब असल्यामुळे आपणास मंजूर झालेले कर्ज देता येत नाही असे बँकेकडून सांगण्यात आल्यानंतर बाबर यांना धक्का बसला .त्यांच्या नावावर एल अँड टी कंपनी कडून बनावट कागदपत्रे जोडून २०२० सालात दिड लाख रुपयाचे फेक कर्ज प्रकरण केल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी तातडीने सोलापुरातील सात रस्ता परिसरातील कंपनीचे कार्यालय गाठले .
बुधवारी दुपारी बराच वेळ थांबून त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची याबाबत विचारणा केली असता त्यांना यातून सुटायचे असेल तर कर्जाचा आकडा जितका आहे, तितकी रक्कम भरण्यास सांगून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे मानसिक धक्का बसलेल्या बाबर यांनी माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे आणि सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांना कानावर घातले. तातडीने या दोघांनी कंपनीचे कार्यालय गाठले.तेथे अमोल शिंदे आणि माऊली पवार यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घ्यायला सुरुवात केल्यानंतर मॅनेजरसह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कंपनीची फसवणूक करून तीन व्यक्तींनी अशा जवळपास ३७ युवक व नागरिकांच्या नावावर फेक कर्ज प्रकरण करून सुमारे ४५ लाखाहून अधिक रक्कम उचलली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले.


















