सोलापूर : राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री शिवसेना नेते दिलीप सोपल हे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी काही वेळ गप्पा मारल्या. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री असल्याने पत्रकारांनी त्यांना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर इथल्या लाकडी निंबोडी या उपसा सिंचन योजनेचा विषय छेडला.
पालकमंत्र्यांना प्रचंड विरोध होत आहे असा प्रश्न पत्रकारांनी केला असता विरोध पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना नाही तर इंदापूर तालुक्यातील सिंचन योजनेला पाणी देण्यास होतोय असे सांगून त्यांनी पालकमंत्र्यांची पाठराखण केली. या विषयावर बोलताना, त्यांनी मुळात आता त्या योजनेला मंजुरी मिळाली आहे, योजना कधी पूर्ण होणार? पाणी कधी मिळणार? याला अनेक वर्ष जाणार आहेत. इंदापूरला पाणी कसे द्यायचे आहे ते नंतर बघा परंतु सोलापूर जिल्ह्यातील जितक्या उपसा सिंचन योजनाचे काम प्रलंबित आहे, ज्या योजना अर्धवट आहेत, त्या प्रथम पूर्ण करा, त्यांना निधीची तरतूद करा अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीत भाजप प्रचारात हा मुद्दा करेल ना?या प्रश्नावर सोपल यांनी हर्षवर्धन पाटील हे भाजपचेच आहेत ना त्यांना त्या योजनेला थोडाच विरोध राहणार आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दूध संघप्रमाणे नेते एकत्र येतील का? या प्रश्नावर त्यांनी दूध संघ हा विषय सहकाराचा होता त्यामध्ये कोणत्या पक्षाचा संबंध नव्हता, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या पक्ष पातळीवर लढवल्या जातात त्यामुळे महाविकास आघाडी मधील नेत्यांनी निर्णय घेतला आघाडी होईल अन्यथा स्वतंत्र सर्व पक्ष लढतील.

















