सोलापूर – आपल्या विविध मागण्यांसाठी सोलापूर सह राज्यातील परिचरिकांनी बेमुदत काम बंद केले आहे. कामबंद केल्याने शासकीय रुग्णालयातील कामकाज किंवा रुग्णसेवा ठप्प झाली आहे. स्वतः रुग्णांचे नातेवाईक सेवा करत असले तरी हेळसांड होत असल्याचे चित्र आहे. खाजगीकरण विरोधात मुंबई येथील आझाद मैदानावर परिचरिकांचे तीन दिवसीय आंदोलन झाले.
यानंतर 26 व 27 मे रोजी कामबंद आंदोलन झाले. मात्र यावर तोडगा न निघाल्याने शनिवार पासून सोलापूरसह राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात कामबंद आंदोलन सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याध्यक्ष मनीषा शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
*या मागण्यांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील कामकाज झाले ठप्प-
शासनाने कंत्राटी पद्धतीने परचारिकांची पदे भारण्यास मान्यता दिली आहे, ती रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने सरकारकडे केली आहे. यापूर्वीही शासनाने परिचारिकांनी केलेल्या राज्यव्यापी आंदोलनानंतर मागण्या तात्पुरत्या स्वरूपात मान्य केल्याचे आश्वासन दिले होते. मात्र आश्वासनाकडे शासनाने दुर्लक्ष केले. आता लेखी आश्वासनानंतरच कामावर परत येण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होणार नाही, तोपर्यंत एकही परिचारिका कामावर हजर होणार नसल्याचे राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व डॉ. शिंदे यांनी बोलताना सांगितले. या आंदोलनात आशा माने, शशिकांत साळवे, वीरेश महाजनी, मीरा सर्वगोड, संध्या जाधव, संध्या गावडे, आशा कसबे, आशा वाघमोडे यांच्यासह विमा हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल आदी रुग्णालयांतील ४०० परिचारिकांचा समावेश आहे.



















