सोलापूर : कोरोना महामारीच्या दोन्ही लाटेमध्ये आई वडील मरण पावलेले 41 मुले आहेत. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोमवार 30 मे रोजी कोविड19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ मुलांशी व्हिडीओ कॉन्फरेन्स द्वारे संवाद साधला.
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बहुउद्देशीय सभागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सची सोय करण्यात आली होती. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, महिला व बालविकास अधिकारी खोमणे ,जिल्हा परिषद महिला व बालकल्याण कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते पी एम केअर चाईल्ड योजनेच्या वतीने देण्यात येणार्या पॅकेजचे किट मुलांना देण्यात आले. या किटमध्ये पोस्टाचे पासबुक त्या खात्यात मुलांच्या नावे 10 लाख, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून 5 लाखाचे विमा संरक्षण, स्नेह संदेश पत्र ज्यामध्ये त्या लाभार्थीचे नाव त्यांचे 23 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळणारे 10 लाख रकमेचा उल्लेख आहे. पंतप्रधान मोदी यांचे शुभ संदेश आहे.
संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 10 वर्षांखालील मुलांना जवळच्या केंद्रीय विद्यालयात किंवा खाजगी शाळेत डे स्कॉलर म्हणून प्रवेश दिला जाईल. ड्रेस, पाठ्यपुस्तके आणि नोटबुकचा खर्च पीएम केअर देईल. 11 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना केंद्र सरकारच्या सैनिक शाळा, नवोदय विद्यालय इत्यादी कोणत्याही निवासी शाळेत प्रवेश दिला जाईल.
वयाच्या 18 व्या वर्षी मुलाला मासिक शिष्यवृत्ती आणि वयाच्या 23 व्या वर्षी 10 लाख रुपयांचा निधी मिळेल. मुलांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी कर्ज मिळवून देण्यासाठी मदत केली जाईल आणि पीएम केअर्स कर्जाचे व्याज भरेल. आयुष्मान भारत अंतर्गत, 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना 5 लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा दिला जाईल आणि प्रीमियम पीएम केअरद्वारे भरला जाईल.



















