सोलापूर: मे महिना म्हटलं की ग्रामीण भागात यात्रा आणि जत्रांचा सुकाळ असतो. अनेक ठिकाणी धार्मिक यात्रांची वेगवेगळी परंपरा दिसून येते. बदलत्या काळात यात्रांमधील अनेक परंपरांना फाटा देत बदल झाल्याचे दिसून येत आहे. दक्षिण सोलापुरातील मंद्रूप येथील श्री चौडेश्वरी यात्रा महोत्सव कमिटीने धार्मिक कार्यक्रमांबरोबर लोकांमध्ये सलोखा राहण्यासाठी वैचारिक कार्यक्रमांवर भर दिला आहे. धर्मगुरूंनी ही या बदलाचे तोंडभरून कौतुक केले आहे.
मंद्रूप येथील श्री चौडेश्वरी देवीची यात्रा 29 मे ते 2 जून या काळात होत आहे. यात्रेच्या निमित्ताने कमिटीने धार्मिक कार्यक्रमाबरोबरच वैचारिक मंथन होण्यासाठी अनेक मान्यवरांची व्याख्याने, किर्तन, भजन, प्रवचनाचे आयोजन केले आहे. मंद्रूपच्या सकळेश्वर मठाचे रेणुकाचार्य शिवाचार्य महाराज यांच्या अध्यक्षतेखाली खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वमी यांच्याहस्ते या उपक्रमाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. दोघांनीही यात्रा कमिटीने धार्मिक कार्यक्रमाबरोबर समाजात चांगल्या विचारांची मुल्ये रुजावीत या जाणिवेतून गेल्या पाच वर्षापासून सुरु केलेल्या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.
यात्रेच्या निमित्ताने पूजा-अर्चा असे धार्मिक कार्यक्रम तर होतातच. व्याख्यान व प्रवचनाच्या माध्यमातून लोकांमध्ये चांगले विचार रुजले जातात. वैचारिक मंथनाने लोकांमध्ये सामाजिक एकोपा व सुखी संसाराची मुल्ये रुजली जातात. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस एकटा पडला आहे. यात्रेच्या निमित्ताने होणारा असा आगळावेगळा उपक्रम इतर गावांनाही आदर्श ठरणारा आहे, असे उद्गार त्यांनी काढले. जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक असलेल्या प्रकाश कुंभार यांनी पुढाकार घेत समाजात वैचारिक मंथन घडवून आणले आहे. विद्यार्थी घडविण्याबरोबरच त्यांनी समाजाला पुढे नेण्याचे पुण्याचे काम केले आहे, असे कौतुक डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले.
गुणवंताचा सन्मान…
या कार्यक्रमात खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याहस्ते शोध पत्रकारितेचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल भूमिपुत्र व ज्येष्ठ पत्रकार राजकुमार सारोळे, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलेल्या मेघा घेरडी यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माजी सरपंच हेमंतकुमार स्वामी, विश्वनाथ स्वामी, मळसिद्ध मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, नागनाथ लोभे, शिवपुत्र जोडमोटे, शिवानंद लोभे, शिवानंद शिंगडगाव, राजकुमार कुंभार आदी उपस्थित होते. यावेळी सावित्रीअम्मा, कर्नाटक किर्तन केसरी शरणकुमार स्वामीजी यांचे प्रवचन तर शोभा महल यांचे कन्नड भजन झाले. मंगळवार दि. 31मे रोजी जादूगार विराट यांचे जादूचे प्रयोग तर अंबादास कनकट्टी यांचा हास्य दरबार हा कार्यक्रम होणार आहे. 1 जून रोजी शालिनीताई इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे. 2 जून रोजी अजित्कुमार कोष्टी यांचा हसवणूक हा कार्यक्रम होणार आहे.