सोलापूर : जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे व जिल्हाधिकारी कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी सतीश माने यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने बहुउद्देशीय सभागृहात सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सर्जेराव दराडे यांना आपल्या बाजूला खुर्ची दिली,दरम्यान दराडे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयाचा एक चतुर्थश्रेणी कर्मचारी सुद्धा सेवानिवृत्त होत आहे असे सूत्रसंचालकाकडून समजल्यावर लगेच शंभरकर यांनी कुठे आहेत ते म्हणताच खाली बसलेल्या कर्मचाऱ्याला बोलावून आपल्या शेजारी सन्मानाने बसवले. यानंतर दोघांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या माणुसकीचा धागा पकडून मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी पद असेपर्यंत माणसाला किंमत असते असे सांगत पदे ही नाममात्र आहेत, पदावर असताना माणुसकी ठेवा आयुष्यभर माणसे जोडली जातील अशा भावना यावेळी व्यक्त केल्या…
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दराडे व माने यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देताना मागील दोन वर्षात कामकाजात दराडे यांचे मिळालेल्या सहकार्यबद्दल समाधान व्यक्त केले. आगामी आषाढी एकादशीनिमित्त दराडे यांनी निश्चित सहकार्य करावे अशी अपेक्षा शंभरकर यांनी व्यक्त केली.
दराडे यांनी आपल्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देत शेवटच्या टप्प्यात सोलापुरातील काम करताना अतिशय चांगल्या अधिकाऱ्यांची संबंध आला आणि त्यांचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार व्यक्त केले..
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी पवार व अप्पर जिल्हाधिकारी जाधव यांनी ही दराडे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.