सोलापूर : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर गळ्यात एमआयएमचा शेला घेऊन मिरवणारे शास्त्रीनगर येथील डीके सोशल ग्रुपचे संस्थापक मोहसिन नदाफ व मौलाली चौक भागातील युवानेते जिया आबादीराजे या दोन्ही युवा नेत्यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत शनिवारी एमआयएमची पतंग सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेले माजी नगरसेवक तौफिक शेख हे उपस्थित होते. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या दोन्ही युवकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले. मोहसिन शेख हे पूर्वी काँग्रेस पक्षात होते, त्यांनी महापालिका निवडणुक लढवली आहे. शास्त्रीनगर या भागातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते इच्छुक आहेत.
काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता तर माजी नगरसेवक गाजी जहागीरदार यांच्या कायम सोबत असणारे जिया आबादीराजे हे सुद्धा महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने या पक्षाला एक प्रकारे धक्का बसला आहे. तौफिक शेख यांनी आतापासूनच एमआयएमला सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे.
ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है अशी प्रतिक्रिया तोफिक शेख यांनी दिली. दरम्यान महेश कोठे यांचा हात डोक्यावर घेऊन आशीर्वाद राहू द्या म्हणणारे शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांची खेळी काय असणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.