सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर झाला होता. यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकारने 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे.
सोमवारी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून त्यास अभिवादन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानातील शिवरायांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुतळा सभोवताली मांडव घालण्यात आला होता. भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून त्याचे पूजन करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादिन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, दिपक कोळी, शिक्षणाधिकारी भास्कर बाबर, उत्तम सुर्वे,गटविकास अधिकारी वाघ, मराठा सेवा संघ कर्मचारी संघटनेचे अविनाश गोडसे, विवेक लिंगराज यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.