सोलापूर : जिल्हा परिषदेची प्रशासकीय सर्वसाधारण सभा प्रशासक तथा सीईओ दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी घेण्यात आली. या सभेत जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी पंडित भोसले यांनी जिल्ह्यातील झेडपीच्या मालकीचे नादुरुस्त असलेले 28 पाझर तलाव राज्य सरकारच्या जलसंधारण विभागाकडे वर्ग करण्याचा विषय उपस्थित केला.
तलाव दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे निधी कमी असल्याने ते तलाव राज्याचा जलसंधारण विभाग आपल्या निधीतून दुरुस्त करेल असा विषय होता. दरम्यान प्रशासक दिलीप स्वामी यांनी यामुळे जिल्हा परिषदेचे कोणतेही नुकसान होणार नाही ना? असा सवाल करत तलावाची मालकी मात्र झेडपीचीच राहील असे ठामपणे सांगितले.
निधीअभावी पाझर तलाव दुरुस्तीचे काम थांबले असले तरी राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाकडून दुरुस्ती होऊन त्यातील पाण्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला तर आमची काय हरकत नाही. सविस्तर पणे प्रस्ताव सादर करा अशा सूचना सीईओ दिलीप स्वामी यांनी संबंधित विभागाला दिल्या.