सोलापूर : महिला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करा, मानधन नको वेतन द्या, सरकारी कर्मचारी करा आणि सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांना चार हजार पेन्शन सुरू करा अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनम गेट समोर महिला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने रखरखत्या उन्हात बुधवारी आक्रोश थाळीनाद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. हजारोंच्या संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
महाविकासआघाडी सत्तेत येण्यापूर्वी आपला वचननामा जाहीर करून अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढ करू पेन्शन देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र मागील दोन वर्ष झाले अद्यापही अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढ झालेले नाही. त्यामुळे आज बुधवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्ह्यातील हजारो महिलांच्या उपस्थित थाळीनाद आंदोलन करण्यात आले. शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
सर्व महिलांनी लाल साडी परिधान केली होती, महिलांच्या हातात थाळी, विविध मागण्यांचे पोस्टर आणि हातात लाल झेंडे होते. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ झालीच पाहिजे, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाही, ईस शासन पर हल्ला बोल, हमारी युनियन, हमारी ताकद, मागतो आमच्या हक्काचे ,नाही कुणाच्या बापाचे अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
हे आंदोलन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस सरला चाबुकस्वार, कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी हेमा गव्हाणे, प्रमिला माळी ,सुलभा कुलकर्णी, अन्नपूर्णा वाघमारे, रंजना गायकवाड, कांचन पांढरे सुनिता गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील महिला त्या संख्येने उपस्थित होत्या.
तर बेमुदत संप करू ;20 जून रोजी यवतमाळ ते अमरावती पर्यंत पदयात्रा
महा विकास आघाडी सरकारने सत्तेने पूर्वी अंगणवाडी सेविका मानधनात वाढ करु असे आश्वासन दिले होते. मात्र सत्य येऊन अडीच वर्ष झाले अद्याप ही मागणी पूर्ण केलेली नाही. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. तीन-तीन महिने मानधन होत नाही महिला जगणार कशा, लवकरात लवकर मागणी मान्य न झाल्यास 20 जून रोजी यवतमाळ ते अमरावती पदयात्रा मोर्चा काढू त्यानंतर ही मागणी पूर्ण न झाल्यास बेमुदत संप करू.
सूर्यमणी गायकवाड, कार्याध्यक्ष
मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन
अंगणवाडी महिलांना मानधनात वाढ करावी आठ हजार रुपये मध्ये संसार कसे चालणार, मानधनात वाढ करावी मानधन नको वेतन द्या, सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी महिलांना दरमहा चार हजार पेन्शन द्या हीच आमची मागणी आहे त्यामुळे एक दिवशीय हे आंदोलन करण्यात आले आहे. आणि लवकरात लवकर आमच्या मागणीचा विचार करावा.
सरला चाबुकस्वार, सरचिटणीस