सोलापूर : सोलापूरच्या राजकारणाला कलाटणी मिळणारी एक घटना शुक्रवारी घडली. एकमेकांचे राजकीय विरोधक समजले जाणारे एमआयएमचेच तौफीक शेख आणि शहराचे अध्यक्ष फारुख शाब्दी यांची गळाभेट झाली. हा क्षण पाहून कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला.
शुक्रवारी एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी सोलापूरात मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्यांविरोधात मोर्चा काढला त्या मोर्चाला एमआयएमचे पूर्वीचे शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्यासह काँग्रेसचे नेते रियाज हुंडेकरी यांनी ही हजेरी लावली. त्यामुळे कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजातील युवकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले. राजकीय व्यासपीठ नव्हता तर तो समाजाचा व्यासपीठ असल्याने सर्व नेते एकत्र आले.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता तौफिक शेख हे एमआयएम सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. ते कधीही प्रवेश करण्याची शक्यता आहे. अशातच एमआयएम अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी सोलापूर महापालिकेत पूर्ण ताकदीने यंदाची निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. विरोधात एमआयएम असेल तर तौफिक पैलवान यांना अडचण होईल अशी शक्यता वर्तवली जातेयं.
मुस्लिम समाजातील युवा वर्गाला तौफिक शेख यांनी पुन्हा एमआयएममध्ये यावे अशी अपेक्षा आहे. हे दोन्ही नेते जर एकत्र आले तर निश्चितच ताकद वाढेल. आणि याचा फायदा महापालिकेत तर होईल मात्र आगामी विधानसभा निवडणूकीत ही एमआयएम जिंकेल अशी चर्चा ऐकण्यास मिळते. एकूणच तौफिक शेख आणि फारुख शाब्दी यांच्या गळाभेटीनंतर येणाऱ्या काळात राजकीय हालचाली बदलतील का? याकडे मुस्लिम समाजातील युवकांचे लक्ष लागून राहिले आहे.

















