सोलापूर : जिल्ह्यात आलेल्या पंचायतराज समितीच्या (PRC Committee) दौऱ्यात अनेक मजेदार किस्से पाहायला मिळाले. यामध्ये सदाभाऊ खोत (#sadabhau_khot) यांना अडवून पैसे मागणार्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय नेते माजी मंत्री महादेव जानकर यांना राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी चांगलाच चिमटा काढला. हा प्रकार काय होता पाहूया…
पंचायत राज समिती गुरुवारी अक्कलकोट तालुक्याच्या दौऱ्यावर होती. यावेळी चपळगाव या ठिकाणी ही समिती पाहणी करण्यासाठी गेली असता त्याठिकाणी महिला बचत गट चालवत असलेले एक हॉटेल दिसले. येथे सर्वांनी जाऊन वडे खाल्ले. तिथे एक आजी वडे तळत होती त्यावेळी त्यांच्या हातातील झारी घेऊन महादेव जानकर (mahadev jankar) यांनी वडे तळण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा आमदार विक्रम काळे (mla vikram kale) यांनी महादेव जानकरांवर आता वडे तळण्याची वेळ असा कॅप्शन येऊ नये असे म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले. या गावात जानकर यांचा कार्यकर्ता आला असता त्यांनी त्याची मर्जी राखत दुचाकीवरून गावात फेरफटका मारला.




















