सोलापूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुदत २४ जुलैला संपणार आहे. तत्पूर्वी, २९ जूनपर्यंत नवीन राष्ट्रपती पदासाठी अर्ज करावा लागणार आहे. १८ जुलैला मतदान होणार असून २१ जुलैला निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. देशातील विरोधी पक्षांकडून राष्ट्रपती पदासाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा होऊ लागली असून ते तातडीने दिल्लीला गेले आहेत अशा बातम्या रविवारी सोलापूरच्या माध्यमातून आल्या.
दरम्यान याबाबत अधिक माहिती घेतली असता ही माहिती समोर आली. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अग्नीपथ योजनेच्या विरोधात देशातील युवकांना समर्थन देण्यासाठी आंदोलन करण्यात आले त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सुशीलकुमार शिंदे हे दिल्लीला गेले होते त्याठिकाणी त्यांनी भाषणही केले अग्निपथ योजनेला विरोध करून सरकारने ही योजना त्वरित रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली….
येत्या मंगळवारी राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली देशातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती मिळाली.


















