सोलापूर : शिवसेनेचे नेते राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरुद्ध बंड पुकारले असून तब्बल 40 हून अधिक आमदार सोबत घेतले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले असून पक्षाने एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांची पदावरुन हकालपट्टी करण्यास सुरुवात केली आहे.
सोलापुरात नुकत्याच पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांनी बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका न करता उद्धव ठाकरे आणि मातोश्रीच्या पाठीशी आम्ही सगळे खंबीरपणे उभे आहोत असा नारा दिला. यामध्ये जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांना पक्षाने बक्षीस म्हणून त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य पदावर नियुक्ती केली आहे. पण एवढ्यावरच न थांबता एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे जिल्हा युवासेना अधिकारी पदावरून मनीष काळजे यांची मात्र हकालपट्टी केली आहे त्यांच्या जागेवर बालाजी चौगुले या युवा नेत्याला संधी देण्यात आली आहे. चौगुले यांच्याकडे सोलापूर संपूर्ण शहर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात हे कार्यक्षेत्र देण्यात आले आहे. काळजे – वानकर गटात मागील काही दिवसांपासून खटके उडत होते त्याचे लोन हाणामारी आणि पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते. याचाच फटका मनीष काळजे यांना बसल्याची चर्चा आहे.

















