सोलापूर : हक्कसोडपत्र तयार करून वडिलांच्या शेतजमिनीवर आईचे नाव लावण्याकरिता दोन हजार रुपयांची लाच घेणार्या तलाठ्यासह एक खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
नारायण विठ्ठल खरात, वय ३६ वर्षे, व्यवसाय नोकरी, पद तलाठी सज्जा संगेवाडी अंतर्गत तहसिल कार्यालय सांगोला रा.मु.पो भांव पो. गिरवी ता. माळशिरस जि.सोलापूर व खाजगी इसम मयुर गुलचंद भोरे, वय २० वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. मु पो संगेवाडी ता. सांगोला जि. सोलापुर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
यातील तक्रारदार यांचे वडील हे मयत झाले असून वडिलांचे शेतजमीनीवर वारसदार म्हणून तक्रारदार, त्यांचा भाऊ व त्यांच्या आईचे नांव लागलेले आहे. सदर प्रकरणामध्ये तक्रारदार यांनी तहसिल कार्यालय सांगोला येथुन हक्कसोडपत्र तयार करुन त्यांचे वडिलांचे शेतजमीनीवर वारसदार म्हणून केवळ त्यांचे आईचे नांव लागावे याकरीता विहीत अर्जासह हक्कसोडपत्र जोडुन सज्जा संगेवाडी येथे अर्ज सादर केला होता.
सदर प्रकरणामध्ये तक्रारदार हे त्या अनुषंगाने पाठपुरावा करीत असतांना यातील आरोपी क्र.०१ तलाठी खरात यांना भेटले असता त्यांनी तक्रारदार यांना हक्कसोड पत्रानुसार वारसदार म्हणुन शेतजमीनीवर तक्रारदार यांचे आईचे नांव लावण्याकरीता २००० रुपये लाचेची मागणी केली व सदर लाच रक्कम यातील आरोपी क्र.०२ खाजगी इसम भोरे यांचे मोबाईल क्रमांकाचे फोन पे खात्यावर पाठविण्याबाबत सांगितले होते.
या प्रकरणामध्ये पडताळणी कारवाई दरम्यान यातील आरोपी क्र.०१ तलाठी खरात यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर प्रकरणामध्ये सापळा कारवाई दरम्यान यातील आरोपी क्र.०१ तलाठी खरात यांनी रु २००० लाच रक्कम आरोपी क्र.०२ खाजगी इसम भोरे यांचेकडे देण्यास सांगितली असता आरोपी क्र. ०२ खाजगी इसम भोरे यांनी ती स्विकारली असता दोन्ही आरोपीस रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
ही कारवाई संजीव पाटील, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि, सोलापूर, चंद्रकांत कोळी पोलीस निरीक्षक, लाप्रवि, पोलीस अंमलदार सोनवणे, सण्णके, पकाले, सुरवसे यांनी केली.

















