सोलापूर : काय डोंगर.., काय झाडी…, काय हाटेल.., सगळ ओकेचं…, केवळ या एका वाक्याने सांगोला शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांची राज्यभरात हवा झाली. एकनाथ शिंदे पेक्षा आमदार बापूंच्या नावाची अधिक चर्चा आहे. एकनाथ शिंदे अखेर राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे आमदार शहाजी बापू यांचीच आता जिल्ह्यात चलती राहणार हे निश्चित आहे.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री न झाल्याने भाजप आमदार कमालीचे नाराज झाले आहेत. अशा वातावणात पंढरपूरची आषाढी एकादशी होत आहे. कोरोना लॉकडाऊनच्या दोन वर्षाच्या गॅप नंतर आषाढी वारी होत आहे. त्यामुळे मोठा उत्साह पहायला मिळतोय. सध्या पंढरपूर शहरातील चित्र पाहिलं असता सर्वत्र आमदार शहाजी बापू पाटील यांचीच हवा दिसून येत आहे. ते सांगोला मतदासंघाचे आमदार असतानाही पंढरपुरात त्यांच्याच बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.
पंढरपूर मंगळवेढयाचे आमदार समाधान आवताडे हे भाजपचे आहेत. ते पंढरपूरचे आमदार असताना त्यांचा स्वागताचा एकही डिजिटल दिसत नाही सर्वत्र शहाजी बापू यांचेच डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. यंदाच्या आषाढी पूजेला नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार असल्याने त्यांच्या मार्गावर बापूंनी पोस्टर लावून बाजी मारली आहे. पंचायत समिती, तहसील कार्यालय समोर हेच पोस्टर आहेत.
डिजिटल तर असे बनवण्यात आलंय की, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांना स्थान नाही. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पायाशी शहाजी पाटील यांनी आपला फोटो लावला आहे. म्हणूनच आमदार भाजपचा, हवा मात्र शिवसेनेच्या आमदाराची, शहाजी बापू सगळं ओकेच अशी चर्चा पंढरपुरात सुरु आहे.


















