सोलापूर : सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेले आणि महानगरपालिकेमध्ये सत्तेचा स्वप्न दाखवणारे महेश कोठे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.
यावेळी त्यांच्या चिरंजीव प्रथमेश कोठे हे सुद्धा उपस्थित होते. विरोधी पक्ष नेते अमोल बापू शिंदे, माजी नगरसेवक मनोज शेजवाळ हे दोन्ही नेते मात्र अधिकृतपणे मुख्यमंत्री शिंदे गटात सामील झाले आहेत. याबाबत अमोल बापू शिंदे यांनी अधिकृत माहिती दिली.
मी अजूनही शिवसेनेत आहे, माझे सोबती माजी नगरसेवक मनोज भाईजी ते सुद्धा आम्ही दोघं शिंदे गटांमध्ये सामील झालो आहोत. विशेष म्हणजे यावेळी 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी महेश कोठे यांना उमेदवारी तिकीट न दिलेले आमदार तानाजी सावंत हे सुद्धा यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत उपस्थित होते.
या प्रकरणी महेश कोठे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु चर्चा अशी आहे की, महेश कोठे यांनी राज्यात शिवसेना व भाजपचे सरकार आल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याची माहिती असल्याचे बोलले जात आहे. मात्र ही राजकीय घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसला नक्कीच धक्का देणारी आहे.





















