सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा
सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा तगादा लावत मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या आरोपावरून विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध विजापूरनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, संबंधित महिलेचा विवाह १० जानेवारी २०२१ रोजी सिंदखेड येथील सचिन काशीनाथ गवसणे यांच्याशी हिंदू रितीरिवाजानुसार झाला. विवाहावेळी वधूपक्षाकडून सोन्याचे दागिने, संसारोपयोगी साहित्य तसेच इतर खर्च करण्यात आला होता. लग्नानंतर सिंदखेड येथे सासरी गेल्यानंतर पती सचिन गवसणे, सासरे काशीनाथ, सासू प्रभावती आणि इतर सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप तिने केला आहे.
लग्नापूर्वी नोकरी लावून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, लग्नानंतर शेतातील कामे करण्यास सांगण्यात आले आणि नोकरी लावण्यास नकार देण्यात आला. सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या कारणावरून शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
सततच्या त्रासामुळे ऑक्टोबर २०२१ मध्ये गर्भपात झाल्याचा, तसेच त्यानंतर पुन्हा गर्भधारणा झाल्यानंतर तीन महिन्यांत गर्भपात झाल्याचा दावा महिलेने तक्रारीत केला आहे. काही काळानंतर तिने जनकल्याण पतसंस्थेत क्लार्क म्हणून नोकरी स्वीकारल्याचेही नमूद केले आहे.
दरम्यान, १४ ऑगस्ट २०२२ रोजी पतीसोबत दुचाकीवरून तेरामैल येथे कामावर जात असताना तेरामैल-औराद रस्त्यावर अपघात झाला. त्यात ती खाली पडली. त्यानंतर पतीने उपचारासाठी दवाखान्यात न नेता तिला माहेरी आणून सोडल्याचा आरोप तिने केला आहे.
काही दिवसांनी ती पुन्हा सासरी गेल्यानंतर सासू-सासरे आणि पतीने नातेवाईकांना बोलावून घेतले. त्यावेळी माहेरून दहा लाख रुपये आणले नाहीत, मुलबाळ होत नाही, सारखी चक्कर येते, त्यामुळे सासरी राहू नको, असे सांगून तिला माहेरी पाठविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यानंतर माहेर व सासरच्या मंडळींची बैठक झाली. माहेरच्यांनी दहा लाख रुपये देणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर महिलेला माहेरीच राहण्यास सांगण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सिद्धाराम ममदापुरे यांनी मध्यस्थी केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. विवाहितेच्या तक्रारीवरून विजापूरनाका पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.















