सोलापूर : जिल्हा परिषदेचे वादग्रस्त शिक्षक रणजीत डीसले यांनी सोलापुरात येऊन मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली सुमारे तासभर झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांनी रणजीत डीसले यांना घेरले त्यांना विविध प्रश्नाची भडीमार केली मात्र त्यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या दशसूत्री कार्यक्रमासाठी चर्चा करण्यासाठी आलो होतो असे सांगून वेळ मारून नेला.
आठ जुलै रोजी ग्लोबल टीचर विजेते रणजित डिसले यांनी जिल्हा परिषद शिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान त्यांच्या अनियमितते बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी चौकशी समिती नेमली होती. त्या पाच सदस्यीय चौकशी समितीचा अहवाल आला आहे. त्या सर्वच बाबतीत डीसले गुरुजी हे दोषी आढळले आहेत अशी माहिती समोर आली. त्यामुळे आता डीसले यांच्यावर निश्चित कारवाई होणार अशी चर्चा सुरू झाली.
त्याच दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली, कारवाईतून सुटका करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. एकूण या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रणजीत डीसले यांनी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन बराच वेळ चर्चा केली.
या चर्चेनंतर ते जेव्हा बाहेर आले तेव्हा सर्व पत्रकारांनी त्यांना घेरले. नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, प्रश्नांचा भडीमार केला, मात्र डीसले यांनी एकाही प्रश्नावर सविस्तर उत्तर दिले नाही. केवळ मी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्या दशसूत्री कार्यक्रमाची चर्चा करण्यासाठी आलो होतो असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आणि जिल्हा परिषदेतून पळ काढला. दरम्यान सीईओ स्वामी यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते बैठकीत असल्याने त्यांची प्रतिक्रिया घेता आली नाही.


















