

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’
सोलापूर : दोन वर्ष नऊ महिन्याच्या सेवेनंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर जिल्हाधिकारी पदावर बदली झाली. त्यांच्या जागेवर आशीर्वाद यांच्याच प्रमाणे यंग डॅशिंग असे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची नियुक्ती झाली.
आशीर्वाद यांनी सोलापूरचा पदभार घेण्यापूर्वी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेऊनच ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते त्याचप्रमाणे नवे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या आपल्या पत्नी याशनी नागराजन यांच्यासोबत पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. विठुरायांचे आशीर्वाद घेऊन ते सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्यालयात आले.
आशीर्वाद आणि कार्तिकेयन या दोन्ही अधिकाऱ्यांचे एकाच गाडीतून जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन झाले. सोबत कार्तिकेयन यांच्या पत्नी होत्या. आशीर्वाद यांनी सर्व अधिकाऱ्यांच्या ओळखी करून दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती दिली. त्यानंतर आपला चार्ज हँड ओव्हर केला. पत्रकारांसोबत बऱ्याच वेळ गप्पा मारल्या नंतर कार्तिकेयन यांना कामकाजाबद्दल बराच वेळ मार्गदर्शन केल्याचे समजले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये काम केल्यानंतर सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतल्यानंतर सोलापूरच्या धार्मिक पर्यटनाला चालना देण्याची भूमिका कार्तिकेयन यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर आशीर्वाद यांच्या नंतर त्यांचे राहिलेले प्रोजेक्ट जसे आयटी पार्क पंढरपूर आणि अक्कलकोट कॉरिडोर याला गती देण्याचा विश्वास व्यक्त केला.
आशीर्वाद यांनी उजनी जल पर्यटन हा महत्वकांक्षी प्रकल्प आपल्या कार्यकाळात झाला नसल्याची खंत व्यक्त केली ती यापुढे नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला गती द्यावी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
मागील पावणेतीन वर्षात कुमार आशीर्वाद यांनी सोलापुरात केलेले काम हे सोलापूरचे जनता कधीही विसरणार नाही पण त्याच जागेवर आलेले कार्तिकेयन यांच्या कामाकडे सुद्धा सोलापूरकरांचे तेवढेच लक्ष राहणार आहे.


















