सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी व अधिकाऱ्यांना मारहाण केल्या प्रकरणी माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी व त्यासोबत असलेल्या इतर तीन अनोळखी व्यक्तीविरोधात शासकीय कामात अडथळा आणि अॅट्रॉसिटी कलमाअंतर्गत सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या संघटनेमार्फत महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
इंदिरा नगर येथे 28 जुलै रोजी ड्रेनेज चेंबर तुडुंब भरून वाहत जात होते. 28 जुलै 2022 रोजी सकाळी नागरिकांनी माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी यांना संपर्क साधून कैफियत मांडली. महानगरपालिका सफाई कर्मचारी व अधिकारी यांच्याकडे तक्रार मांडली. काँग्रेसचे माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी यांनी बोलावल्यावर सोलापूर महानगरपालिकेचे काही कर्मचारी आणि अधिकारी त्या ठिकाणी आले असता. पण आलेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांना जबरदस्त मारहाण करण्यात आली . त्यांना ड्रेनेजच्या पाण्याने अंघोळ घालण्यात आली.
महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांनी याचा निषेध करत दुसऱ्या दिवशी ताबडतोब 29 जुलै 2022 रोजी महानगरपालिका आवारात अशोक जानराव यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन केले. एका सफाई कर्मचाऱ्यास 70 फूट रोड वरील इंदिरा नगर येथे विनाकारण मारहाण झाली. याचा तीव्र निषेध करण्यात आला आणि संबंधित माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी सह मारहाण करणाऱ्यांर गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा 9 ऑगस्ट रोजी कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. अशा मागण्यांचे निवेदन महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर याना देण्यात आला होता. संघटनेच्या मागणीला यश आले असून रियाज हुंडेकरीसह त्यासोबत असलेल्या तिघांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणि अॅट्रॉसिटी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.



















