सोलापूर : महापालिकेच्या राजकारणात सोलापुरात महेश कोठे यांचा हात कुणी धरू शकत नाहीत. हे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी महापालिकेची जबाबदारी पूर्णपणे महेश कोठे यांच्या खांद्यावर दिली आहे. कोठे आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जोरात इनकमिंग सुरू झाले. महेश कोठे राष्ट्रवादीत असल्याने काँग्रेस पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एमआयएमच्या नगरसेवकांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसलाच जवळ केले. महापालिकेत सत्ता आणतो असे स्वप्न कोठे यांनी राष्ट्रवादीला दाखवले होते.
अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर राज्याच्या सत्तेत उलथापालथ झाली, शिवसेना फुटली, भाजपला जाऊन मिळाली. आता शिंदे गट व ठाकरेंची शिवसेना असं चित्र राज्यात तयार झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर दौऱ्यावर आले असताना कोठे यांनी आपल्या समर्थकांसह शिंदेंची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केलेल्या कोठे हे आता लांब लांब राहत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान अक्कलकोट जवळ एसटीचा अपघात झाला होता, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी महेश कोठेंना फोन लावून चौकशी करण्यास सांगितले, नंतर कोठे यांच्या मोबाईल व्हिडीओ कॉल वर जखमींशी चर्चा करून धीर दिला. आता अशी चर्चा आहे की, शिंदे यांच्या गटातून कोठे हे विधान परिषदेसाठी प्रयत्न करीत आहेत. तसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना त्यांनी सांगितले असून विधान परिषद निवडी पर्यंत थांबावे, त्यामुळे नेमके कोठे कोणाचे? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला, तिथून काँग्रेस गळतीला सुरुवात झाली. शहर मध्यचा विचार करून कोठे शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतली, प्रवेश पक्का केला. परंतु सोलापुरात आल्यानंतर मी काँग्रेस मध्येच राहणार असे सांगून काँग्रेसला झुलवत ठेवले. शिवसेनेकडून निवडणूक लढवली, पराभूत झाले. पुन्हा त्यांनी भाजप नेत्यांशी संपर्क वाढवला.
चंद्रकांत पाटील घरी येऊन गेले, 2019 च्या निवडणुकीत युती झाली, मध्य मधून तिकीट डावलण्यात आले. बंडखोरी करत त्यांनी निवडणूक लढवली. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, परत त्यांनी शिवसेनेत असल्याचं सांगत स्वतःला सावरून घेतले. शिवसेनेत ही त्यांचे मन रमेना, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पाहता ते शरद पवारांच्या संपर्कात आले. अनेक महिन्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होते, स्वतः शरद पवार हे कोठेंना ताकद देण्यासाठी सोलापुरात येऊन गेले.
आता परत सत्ता बदलली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचा संपर्क वाढला आहे. त्या गटाकडून ते आमदार होण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सोलापुरात महेश कोठे यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 2009 साली काँग्रेस कडून निवडणूक लढवली होती, केवळ 10-12 हजाराच्या फरकाने त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2014 व 2019 च्या निवडणुकीत मोठ्या फरकाने मागे राहिले आहेत. पक्ष आदलाबदलीमुळे त्यांचे नुकसानच होत असल्याचे चित्र दिसत आहे.





















