सोलापूर : पूर्वाश्रमीचे एमआयएम नेते तौफिक शेख हे विजापूर तुरुंगातून जामीन होऊन आल्यानंतर एमआयएम पक्षापासून दूर राहणे पसंत केले. त्यांच्या गटात 10 पैकी 7 नगरसेवक असल्याने त्यांची ताकद होती. नंतर त्यांनी महेश कोठे यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. तेव्हापासून त्यांनी एमआयएम पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थिती लावली नाही. त्यांनी आपलं पुढील चित्र स्पष्ट केलं होतं. परंतु राष्ट्रवादीत प्रवेश केला नाही.
शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी मात्र आपलं काम चालू ठेवलं. अनेकांना अपेक्षा होती पैलवान यांनी एमआयएम सोडू नये, त्यातच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असस्सुद्दीन ओवेसी यांचा सोलापूर दौरा झाला, पैलवान त्यांची भेट घेणार का अशी चर्चा होती. पण तसे झाले नाही. ओवेसी यांनी ही स्थानिक नेत्यांबाबत कोणतेही भाष्य केले नाही.
दरम्यानच्या काळात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अपशब्द काढल्याबद्दल सोलापुरात फारूक शाब्दी यांनी मुस्लिम समाजाला एकत्र येण्याची आवाहन करत मोर्चाची हाक दिली होती. तो मोर्चा सोलापुरात अविस्मरणीय ठरला, हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज या मोर्चात सहभागी झाला. मोर्चा असून शाब्दी यांनी मार्केट मारले. विशेष म्हणजे तौफिक शेख आणि फारूक शाब्दी यांची गळाभेट झाली. त्यामुळे पैलवान एमआयएम मध्येच थांबणार का?असेही बोलले जाऊ लागले.
राज्यात सत्तांतर झाले, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेतून खाली आले, मग एमआयएमचे माजी नगरसेवक आता कशाला एनसीपीमध्ये जातील अशी चर्चा होत असतानाच तौफिक शेख यांनी आपल्या सहा समर्थक माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आता तौफिक शेख यांचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. यानंतर आपल्या वाटेतील काटे आपोआपच बाजूला झाल्याने चारच दिवसात एमआयएम शहराध्यक्ष फारूक शाब्दी हे मैदानात उतरले आहेत.
पैलवान यांचा बालेकिल्ला असलेल्या नई जिंदगीत जाऊन त्यांनी आपले संपर्क कार्यालय सुरू केले आहे. ते आता घरोघरी जाऊन एमआयएमची पतंग पोहोचवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करीत आहेत. आता राजकीय चित्र स्पष्ट झाल्याने आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध एमआयएम अशीच लढत या भागात पहायला मिळणार आहे.

















