सोलापूर : शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. ही लढाई न्यायालयात जिंकण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी जोरदार काम करावे, असा कानमंत्र शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ (मुंबई) यांनी दिला.
शासकीय विश्रामगृहावर शुक्रवारी झालेल्या शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका अस्मिता गायकवाड, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, भीमाशंकर म्हेत्रे, अमर पाटील, दत्ता वानकर, प्रा. अजय दासरी, शहर उत्तरचे समन्वयक महेश धाराशिवकर, लहू गायकवाड, कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी, दक्षिण सोलापूर तालुकाप्रमुख योगीराज पाटील, युवती सेनेच्या जिल्हा संघटिका पूजा खंदारे उपस्थित होते.
शिवसेना कोणाची याचा निकाल २२ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. त्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याकरिता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभर शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबवण्याचे आदेश दिले आहेत. या अभियानाचा आढावा घेण्यासाठी संपर्कप्रमुख श्री. कोकीळ शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी शहर मध्य, शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर या तीन विधानसभा मतदारसंघातील कामाचा आढावा घेतला.
शाखाप्रमुख हा संघटनेचा पाया आहे. शाखाप्रमुखाच्या जोरावरच शिवसेनेचे संघटन मजबूत टिकून आहे. शिवसेनेला न्यायालयातील लढाई जिंकणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी सर्व शाखाप्रमुखांना सोबत घेऊन शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेची सदस्य नोंदणी करावी. ज्या पदाधिकाऱ्यांना पद मिळाले आहे, अशा पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे चांगले काम करून दाखवणे गरजेचे आहे.
सदस्य नोंदणीच्या माध्यमातून शिवसेना घराघरात पोहोचवणे ही शिवसैनिकांची जबाबदारी आहे. इतकी वर्षे शिवसेनेने रस्त्यावरची लढाई केली आहे. आता न्यायालयीन लढाईची वेळ आहे. सर्वांनी समन्वयाने काम केल्यास ही लढाई जिंकता येऊ शकते, असा विश्वासही संपर्कप्रमुख कोकिळ यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी उपशहर प्रमुख बाळासाहेब गायकवाड, रेवण अतुल भवर, रविकांत कांबळे, रेवण बुक्कानुरे, संताजी भोळे, रतन खैरमोडे, सचिन गंधुरे, सुरेश जगताप आदी उपस्थित होते.
—————–
खा. विनायक राऊत यांचे होणार जोरदार स्वागत
सांगोला येथे रविवारी शिवसेनेचा मेळावा होणार आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी रविवारी सकाळी ते सोलापूरात येणार असून खा. राऊत यांचे सोलापूरात जोरदार स्वागत करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.


















