सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोलापुरातील कट्टर समर्थक मनीष काळजे यांना मोठी संधी मिळाली आहे. त्यांची थेट जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. काळजे यांच्याकडे अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तसेच बार्शी या तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मनीष काळजी यांच्याकडे यापूर्वी युवा जिल्हा प्रमुख पद होते मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर त्यांना पदावरून तडकाफडकी काढण्यात आले होते मात्र या युवा नेत्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जिल्हाप्रमुख करून सर्वांचे तोंडे बंद केली आहेत.
तसेच नुकतेच एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलेले सोलापूर महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांचीही जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सचिव संजय गोरे यांच्या हस्ते पत्र स्वीकारण्यात आले. यावेळी नूतन शहरप्रमुख मनोज शेजवाळ, नूतन उपजिल्हाप्रमुख हरिदास चौगुले यांची उपस्थिती होती. अमोल शिंदे यांच्याकडे सोलापूर शहर उत्तर तालुका, मंगळवेढा हे तालुके देण्यात आले आहेत. अमोल बापू यांनी सोलापूर महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेते पदावर काम करताना आपली मोठी छाप काढली होती सध्या त्यांची सार्वजनिक गणेशोत्सव मध्यवर्ती समितीच्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे. अमोल शिंदे यांनी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पद, काँग्रेस पक्षातून युवक लोकसभा अध्यक्षपद भूषवले आहे, त्यानंतर ते शिवसेनेत नगरसेवक झाले, विरोधी पक्ष नेता झाले आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातून जिल्हाप्रमुख या पदावर त्यांना मोठी संधी मिळाली असून या पदाला न्याय देऊन हिंदुहदय सम्राट बाळासाहेबांची शिवसेना जिल्ह्यात वाढवण्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.




















