सोलापूर : चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सोलापूर शहराला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा अध्यक्ष मिळाला असून या पदावर आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव डॉक्टर किरण देशमुख यांचे समर्थक गणेश साखरे यांची निवड झाली आहे.
भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदावर यापूर्वी वृषाली चालुक्य या होत्या. तब्बल चार वर्षापासून हे पद रिक्त होते या पदासाठी सुभाष देशमुख समर्थक अक्षय अंजीखाने, विजयकुमार देशमुख समर्थक प्रवीण दर्गोपाटील, आमदार राम सातपुते समर्थक यतीराज होनमाने, सागर आतनूरे, माजी विरोधी पक्षनेते सुरेश पाटील यांचे चिरंजीव बिपिन पाटील, जगदीश पाटील यांचे चिरंजीव अमित पाटील हे इच्छुक होते.
प्रवीण दर्गेपाटील हे महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक होते मात्र आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांना भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष करण्याचा शब्द दिला होता अशी माहिती समोर येत आहे. मात्र पुत्र प्रेमापोटी त्यांनी आपला शब्द पाळला नाही अशी चर्चा आता नाराज कार्यकर्ते करू लागले आहेत.
गणेश साखरे हे केवळ आमदार पुत्र किरण देशमुख यांच्याच गाडीत फिरतात, म्हणून त्यांना अध्यक्ष केल्याचा सूर उमटू लागला आहे. अनेक कार्यकर्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच संघ परिवारातील असले तरी त्यांचा विचार का? झाला नाही असा प्रश्न आता नाराज कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे.






















