कासेगाव— दिवसेंदिवस वाढणारी महागाई, बेरोजगारी, व्यसनाधीनता, नैराश्य आदीला फाटा फोडत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील नवयुवक केशव संभाजी चौगुले यांनी आपल्या दुग्ध व्यवसाया बरोबरच बासुंदी व खवा निर्मितीला सुरुवात केल्याने कासेगाव परिसरात एक नवा उद्योग सुरू झाला आहे.
गाईच्या शुद्ध दुधापासून खवा बासुंदीची निर्मिती होत असल्याने कासेगाव, उळे, उळेवाडी, गंगेवाडी, तामलवाडी, धोत्री, खडकी, गंगेवाडी सह सोलापूर शहरांमध्येही या खवा व बासुंदीची मागणी वाढली आहे. केशव यांना खवा व बासुंदी तयार करण्यासाठी भाऊ विजय, आई उर्मिला, वडील संभाजी हे मदत करतात. मोहोळ तालुक्यातील पाथरी येथून दररोज 160 लिटर गाईचे शुद्ध दूध केशव यांचे बंधू विजय हे घेऊन येतात.40 लिटर दुधापासून आठ ते नऊ किलो खवा तयार होतो. दिवसातून ते 35 किलो खवा तयार करतात त्यामुळे उत्कृष्ट व शुद्ध गाईच्या दुधापासून बनवलेल्या खव्याची व बासुंदी ची मागणी दिवसेंदिवस या भागांमध्ये वाढत असल्यामुळे त्यांच्या उत्कृष्ट गुणवत्तेला ग्राहकाची पसंती मिळत आहे.
आज कालच्या युगामध्ये सर्वाधिक तरुण युवा वर्ग हा व्यसनाच्या आहारी गेला आहे परंतु कासेगाव येथील नवयुवक केशव आणि विजय या दोन बंधूंनी आपल्या दुग्ध व्यवसायाच्या जोड धंदा बरोबरच खवा व बासुंदीचे निर्मितीला चांगली सुरुवात केल्यामुळे गावातून त्यांचे कौतुक होत आहे.
जनावरांना लागणारे वैरण म्हणजे पेंड, भुसा गवत आधी महाग झाल्यामुळे दूध व्यवसाय धोक्यात आला आहे त्याच बरोबर दुधाचे दर ही म्हणावे तसे मिळत नसल्यामुळे आपण हा व्यवसाय सुरू केला असल्याचे यावेळी युवा उद्योजक केशव चौगुले यांनी सांगितले.



















