सोलापूर : काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवक अध्यक्ष जावेद पटेल यांनी बहुजन आघाडी सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर केवळ आठ दिवसात शहराध्यक्ष हजरत अली बडेखान यांनी पक्षाला राम राम ठोकत आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे बहुजन आघाडी ही कार्यकर्त्यांपासून आता वंचित होतानाचे चित्र सोलापूर शहरात आहे.
दरम्यान बडेखान यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिले आहे की,
मी गेली ३ वर्षांपासून आपल्या पक्षामध्ये “शहर अध्यक्ष” या पदावर कार्यरत आहे. सध्या माझ्या वैयक्तिक कारणांमुळे व माझ्या कामाच्या व्यापामुळे पक्ष कामात वेळ देऊ शकत नसल्याने अथवा वेळ मिळत नसल्याने मी स्वतःहून माझ्या “शहर अध्यक्ष” पदाचा राजीनामा देत आहे. तरी आपण मला जो मान सन्मान दिलात, याबद्दल मी आपले सदैव ऋणी असेन. तसेच आपण माझे राजकीय व सामाजिक नेते म्हणून कायमच हृदयस्थानी रहाल. तरी माझा सोलापूर शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा.




















